Thursday, September 04, 2025 07:13:20 AM

चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला, 3.70 कोटी रुपयांचा अपहार

बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅक; पोलिसांनी रोखला मोठा घोटाळा

चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला 370 कोटी रुपयांचा अपहार


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगारांनी बँकेची एनएएफटी व आरटीजीएस प्रणाली हॅक करून तब्बल ३ कोटी ७० लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याने बँकेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणामुळे बँक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच बँक भरती घोटाळा उघडकीस आला होता, आणि आता सायबर हल्ल्याच्या घटनेने खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बँक व्यवस्थापनाने ही घटना लक्षात येताच रामनगर व सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली व महत्त्वाची कारवाई केली.

खाती हॅक करून रक्कम दिल्ली-नोएडाच्या खात्यांमध्ये वळती
सायबर गुन्हेगारांनी बँकेची ऑनलाइन प्रणाली हॅक करून खात्यांमधून मोठ्या रकमेचा अपहार केला. बँकेची एनएएफटी व आरटीजीएस प्रणाली भेदून रक्कम थेट दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांमध्ये वळती केली. पोलिसांनी तातडीने तपास करून १ कोटी ३१ लाख ९९ हजार रुपये परत मिळवण्यात यश मिळवलं. तसेच १ कोटी रुपयांच्या ट्रान्झेक्शनवर बंदी (सीज) घातली.

👉👉 हे देखील वाचा : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 हजार 320 लाखांचा घोटाळा?

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्हाभर मोठा विस्तार आहे. येथे शासकीय बँकेशी लिंकअप असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दररोज ऑनलाइन व्यवहार केले जातात. विशेषतः एनएएफटी व आरटीजीएस व्यवहारांमध्ये मोठ्या रकमेचा सहभाग असतो. त्यामुळे सायबर सुरक्षेत झालेल्या या त्रुटीने बँकिंग यंत्रणेतील सुरक्षा यंत्रणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

खातेदारांमध्ये चिंता; पोलिसांचा सतर्क इशारा
जिल्ह्यात अशाप्रकारचा सायबर हल्ला प्रथमच घडला आहे. बँक खातेदारांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी सायबर सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन केले आहे. तसेच, संशयित व्यवहारांची तातडीने माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री